तरूणाईच्या वळणावरती
मी वळून गेलो सहज
बघता - बघता कवी
मी बनून गेलो सहज ||१||
कविता मला भेटली
एका गंधाळल्या क्षणी
मी केले प्रेम कवितेवर
दिवस - रात्र, क्षणोक्षणी ||२||
चारोळी, हायकू, काव्यांजली
गझलेला तरूणाईत बहर
पंख फुटूनी उडालो आकाशी
काव्यरचनेला येई बहर ||३||
यौवनात नाही केली नशा
चढली धुंदी फक्त कवितेची
नाही केली तप - तपश्चर्या
केली पूजा फक्त कवितेची ||४||
वागलो ना बेफिकीर कधी
म्हातारपणी आठवे तरूणपण
गात्रे थकली, देह जराजर्जर
तरी मनाने आहे तरूणपण ||५||
No comments:
Post a Comment