Wednesday, December 12, 2018

मी लाजाळूचं झाड... मराठी ( कविता )


स्पर्श तुझा होताच
मिटून घेते स्वतःला मी
मी लाजाळूचं झाड...



जेव्हा हसतोस तू
भरून येतो ऊर
तू नसतांना मात्र                                


मनात शंकांचे काहूर              
तुला ठेवते जपून
माझ्या हृदयात मी
मी लाजाळूचं झाड...


अंगी तू बिलगता
तनूला येतो शहारा
माझ्या स्वप्नांवर राजसा
सदैव तुझाच पहारा
सोपवले मन तुझ्याकडे
सर्वस्व अर्पिले तुला मी

 मी लाजाळूचं झाड...


नको मला चंद्र, तारे
नको कोरडे किनारे
तूच सागर माझा
तुझ्यात सुखाचे वारे
हृदयाचा हृदयाशी संगम
होते नदी तुझी मी

मी लाजाळूचं झाड...


घेऊ नकोस आढेवेढे
आता हा हट्ट तू सोड

झाडाची फुले नाजूक
टणक आहे खोड
आले शरण तुला मी

मी लाजाळूचं झाड...


लाजते, नटते, मुरडते
अखंड धावा तुझा करते
आवडतोस मला तू
 

मी तुझ्याचसाठी सजते
प्रेमधुंदीत प्रेमगीत गाते मी

मी लाजाळूचं झाड... 


डोळ्यांच्या कडेने पाहते
लाजून बघते मी तुला
देते वचन सात-जन्मांचे
स्वीकारूनी घे मला
प्राणप्रिय, हृदयसखा तू
झाले तुझी अर्धांगिनी मी
 

मी लाजाळूचं झाड...


स्पर्श तुझा होताच
मिटून घेते स्वतःला मी 

मी लाजाळूचं झाड... 

No comments:

Post a Comment