आजीने सांगितलेली गोष्ट झाली खरी
मी गेले स्वप्नातल्या परीच्या घरी... ॥धृ॥
परीचे घर होते खूप विशाल
चमचमता सोन्याचा महाल
महालाभोवती सुंदर तळे
घराच्या अंगणात स्ट्राॅबेरीचे मळे... ॥१॥
परीचा पोशाख लाल - लाल
मऊ - मऊ गुलाबी गाल
परीला शोभतो मोत्यांचा साज
परीचा मधासारखा गोड आवाज... ॥२॥
परीला मैत्रिणी होत्या भरपूर
परीच्या राज्यात आनंदाचा पूर
आकाशाचा चांदोबा खूपच हट्टी
तरीही परीची चांदोबाशी गट्टी... ॥३॥
परीराज्यात केली आम्ही सैर
परीचे होते राक्षसांशी वैर
आला राक्षस अक्राळविक्राळ
परीने त्याला मारले तात्काळ... ॥४॥
लुकलुक करती चांदण्या, तारे
पुन्हा सुखाचे वाहतात वारे
परीने फिरवली जादूची छडी
आपोआप उघडली दाराची कडी... ॥५॥
चांदोबाच्या शिडीने आले घरी
तिच्या घरी एकटीच गेली परी
आईचा आवाज आला कानावर
तेव्हा आले मी स्वप्नातून भानावर... ॥६॥
No comments:
Post a Comment