माझी माऊली... अभंग रचना
माझी गं माऊली । सुखाचा सागर ।
प्रीतीची घागर । ओतप्रोत..... ॥१॥
पसर ना आई । पदर मायेचा ।
तुझ्याच छायेचा । ऊबदार..... ॥२॥
पिकवते सोनं । काळ्या शिवारात ।
घामाच्या धारांत । कष्टातुनी..... ॥३॥
विठ्ठल माऊली । सुखी व्हावी आई ।
मधुर अंगाई । ओठी तिच्या..... ॥४॥
माय आणि बाप । माझे दोन देव ।
कृतज्ञता भाव । त्यांच्यासाठी..... ॥५॥
याद येता तिची । पाणी येई डोळां ।
मी पोटाचा गोळा । तिच्यासाठी ॥६॥
मायेचा पदर । दुष्काळात पाणी ।
गाते 'उमा' गाणी । ममतेची..... ॥७॥
No comments:
Post a Comment