Sunday, December 16, 2018

भोग जन्माचे मराठी कविता

भोग जन्माचे आम्हांला
नाही कधीच चुकले
दुष्काळात या वर्षीच्या
भाग्य आमचे सुकले..... ॥१॥
 

शेतकरी झालो इथे
काळी माती झाली आई 
पिके पेरली शेतात 
झाली उगायची घाई..... ॥२॥                         

गेले पालटून भाग्य 
विपरीत कसे घडले ?
घात दुष्काळाने केला 
प्राण कंठातच अडले..... ॥३॥
 

लढू संकटाशी तरी
जरी अवस्था बिकट 
कणखर बळीराजा 
मन खंबीर, राकट..... ॥४॥
 

कर्ज हे सावकाराचे
बसे मानगुटीवर
आत्महत्या करूनी का ?
लटकावे फासावर..... ॥५॥
 

कष्ट करून जोमाने
फुलवावे हे शिवार
काळ्या आईच्या कुशीत
आता भिजावे आवार..... ॥६॥
 

आता एकच पर्याय
जावी मोहोरून शेती
याव्या पावसाच्या धारा
ओली व्हावी काळी माती..... ॥७॥
 
 

No comments:

Post a Comment