सोळा शृंगार करूनी केला साज
साजणाला बघून आली लाज... ॥धृ॥
ऐकलंत काऽऽऽ
हिला साजणाला बघून आली लाज
अंगापिंडानं मजबूत गडी
येता जवळ तो, दूर मी खडी
आली मिलनाची ती घडी
हळूच दाराला लावली कडी
हवेत भरला प्रेमसुगंध आज
साजणाला बघून आली लाज... ॥१॥
साजणा माझा साधा, भोळा
बघून मला मिचकावतो डोळा
अवंदा पार केलं मी वरीस सोळा
लाज - लाजुनी पोटात येई गोळा
करती दोघे एकांती प्रीतीचे गूज
साजणाला बघून आली लाज... ॥२॥
कितीदा नाही म्हटले तरी
माझ्या जवळ तो येतो तरी
मिठीत घेण्या लगट करी
म्हणतो, तूच स्वप्नातली परी
घातला डोक्यावर राणीचा ताज
साजणाला बघून आली लाज... ॥३॥
राघू - मैना एकमेकांना छळती
श्वास होतोया खाली - वरती
वर आभाळ नि खाली धरती
अथांग सागराला आली भरती
तूफानी सागराची घुमते गाज
साजणाला बघून आली लाज... ॥४॥
भर-भर उडाले पाखरांचे थवे
साजणा, हे नको मला ते हवे
आज दिसती स्वप्न नवे - नवे
खुशीत मी खूप साजणासवे
नव्या पर्वाचा झाला आगाज
साजणाला बघून आली लाज... ॥५॥
ही भेगाळली काळीशार धरा
तिला चिंब पावसात भिजव जरा
तुझ्या - माझ्या प्रेमाचा वाहू दे झरा
साजणा, ने रे मला तुझ्या घरा
माझ्या साजणाचा वेगळा अंदाज
साजणाला बघून आली लाज... ॥६॥
नार चंचल, मी गुलाबी कळी
अजून उलगडली ना पाकळी
मी सुकुमारी, देखणी, कोवळी
घेऊन द्या हो, सोन्याची साखळी
तू शाहाजहान, मी तुझी मुमताज
साजणाला बघून आली लाज... ॥७॥
No comments:
Post a Comment