Monday, December 31, 2018

तुझ्या आठवणीत... मराठी कविता... Marathi Kavita... Marathi Poem...


तुझ्या आठवणीत आज
काय लिहू मी ?
तुझी आठवण आल्यावर 
शब्दच गोठून जातात...
तुझा चेहरा दिसत राहतो फक्त...
माझ्या मनावर उमटलेला...

                        
तू बोलायचास कसा,
तू हसायचास कसा,
तू माझ्याकडे बघायचास कसा...
या सर्व गोष्टी आठवत राहतात
आठवत राहतं तुझं प्रेम...
जे प्रेम तू माझ्यावर केलं होतं...
ते आपलं प्रेम...

तुला विसरून जायचा प्रयत्न
मी कधीच केला नाही...
कारण, मला माहित आहे की,
ते कधीच शक्य नाही...
ज्यांना आपण विसरूच शकत नाही
त्यांची आठवण तरी कशी काढावी ?
असं तूच म्हणायचास ना...

तू मनातून जातच नाहीस
कित्येकदा असं वाटतं की,
बोलावं तुझ्याशी पण,
धाडस होत नाही...
कसं आणि काय बोलणार तुझ्याशी ?

मग मी माझ्या स्वतःशीच बोलून घेते...
तुझ्यावर प्रेम करावंसं वाटतं तेव्हा मी 
माझ्या स्वतःवरच प्रेम करून घेते...
कारण आपण एक आहोत ना...
आपला श्वास एक आहे...
तू म्हणजे मीच आहे ना...
आहे ना...


Sunday, December 30, 2018

नवे वर्ष... Happy New Year... मराठी कविता... Marathi Kavita...


आले हो आले हो, आनंदाचे वर्ष नवे
चला गाऊया गीत खुशीचे सर्वांसवे ॥धृ॥

नवीन वर्षी मुखावर ठेवूया हर्ष                             
सर्व संकल्प पूर्तीचे जावो नवे वर्ष
नव्या किरणांची नवी पहाट भुलवे ॥१॥

जपून मने एकमेकांना देऊ मान
ठेवू नेहमी आपण वास्तवाचे भान
निळ्या आकाशी पाखरांचे उडती थवे ॥२॥

अन्यायाचे, अंधश्रद्धेचे करू दहन
चांगल्या सवयींचे सदा करू जतन
हे देवा, नव्या वर्षात सुख मला हवे ॥३॥

सरत्या आठवणी... Happy New Year... मराठी कविता... Marathi Poem...


सरत्या आठवणींने
मन भूतकाळात रमले
स्वप्न सजले
गतकाळाचे... {१}

आशेच्या किरणांनी                                        
निरोप वर्षाला देऊ
ओंजळीत घेऊ
सुखस्वप्ने... {२}

नवीन पालवी
नवे वर्ष रंगीत
गुणगुणू संगीत
प्रीतीचे... {३}

नको मांसाहार
नको दारूचे व्यसन
नको जागरण
जीवघेणे... {४}

गणेशाने सुरूवात
नवीन वर्षाची करू
गुरूला स्मरू
अखंडीत... {५}

मिळो उभारी
सर्वांच्या नवीन संकल्पांना
भविष्याच्या कल्पनांना
आशादायी... {६}

सुख, दुःख
देऊन गेले वर्ष
ओठांवर हर्ष
सदैवच... {७}

स्वागत करूया
नव्या उगवत्या सूर्याचे
प्रकाश किरणांचे
विलोभनीय... {८}

आशेच्या पंखांनी
कर्तृत्वाची गगनी भरारी
बाणा करारी
ठेवूयात... {९}

होवोत पूर्ण
तुमच्या सर्व इच्छा
सर्वांना शुभेच्छा
नववर्षाच्या... {१०}

Thursday, December 27, 2018

शिवाजी महाराज... ( पोवाडा ) Shivaji Maharaj... ( Powada )


शत्रूचे मुंडके छाटाया सदैव तैयार
चमके शिवबाची तेजस्वी तलवार...॥धृ॥
जी... जी... रं... जी...

१६३० च्या साली, शिवनेरी गडावर
१९ फेब्रुवारी, या शुभ मुहूर्तावर
जन्मला एक पुत्ररत्न थोर जी
नाव ठेवले त्याचे 'शिवाजी'... ॥१॥
जी... जी... रं... जी...                                              

जिजाबाई - शहाजीचा पुत्र
मराठ्यांना आधाराचे छत्र
जिजाऊ सांगे कर्तृत्वाच्या कथा
रचली शूरवीर गौरवाची गाथा... ॥२॥
जी... जी... रं... जी...

रायरेश्वराकडे केली शिवबाने प्रतिज्ञा
दादोजी कोंडदेवांची मानायचा आज्ञा
सोळाव्या वर्षी जिंकूनी तोरणा
मिळाली स्वराज्य निर्मितीची प्रेरणा... ॥३॥
जी... जी... रं... जी...

आगळा - वेगळा भव्य राज्याभिषेक 
केला नद्यांच्या जलाचा अभिषेक
मुंडकी वळवली अफजलखानाची
छाटली बोटे शायिस्तेखानाची... ॥४॥
जी... जी... रं... जी...

मित्र मावळे शूर, मराठी सरदार
त्यांच्यासोबत खाल्ली कांदा, भाकर
असा होता छत्रपती शिवाजी
त्याला रयतेची काळजी... ॥५॥
जी... जी... रं... जी...

अनेक किल्ले, दुर्ग जिंकले
स्वराज्याचे स्वप्न सजवले
'हर हर महादेव'ची गर्जना
कानाकोपऱ्यांत पोचली घोषणा... ॥६॥
 जी... जी... रं... जी...

प्रयत्नांची करूनी शर्थ
स्वराज्याला मिळवून दिला अर्थ
फडकवले मराठ्यांचे निशाण
राजा शिवराय रयतेचा अभिमान... ॥७॥
जी... जी... रं... जी...


आग्याहून सुटका झाली
सूरत शहराची लूट केली
'राजगड' स्वराज्याची राजधानी
शिवाजी राजा होता अभिमानी... ॥८॥
जी... जी... रं... जी...


चारही दिशांत दुमदुमली किर्ती
छत्रपती शिवाजी आदराची मूर्ती
रायगडावर घेतला अखेरचा श्वास

या मातीला छत्रपतींचा सुवास... ॥९॥
जी... जी... रं... जी...


हिंदवी स्वराज्याला मिळाला आकार
स्वराज्याचे स्वप्न होतसे साकार
शिवाजी रयतेचा राजा महान

शाहीर गातो त्याचे गुणगान..... ॥१०॥
जी... जी... रं... जी...


Wednesday, December 26, 2018

आठवणींच्या हिंदोळ्यावर... मराठी कविता... Marathi Poem... Marathi Kavita...


आठवण तुझी येता
रूप माझे खुलते
आठवणींच्या हिंदोळ्यावर
मन बावरे झुलते..... {१}
                  
चंद्र-चांदणीच्या साक्षीने
ढगांवर सजवला प्रेमझुला
दिलेले वचन निभव रे
माझ्या प्रीतीच्या फुला..... {२}

क्षण आपले सोबतीचे
मला रोज आठवतात
तू नसतोस जवळी तेव्हा
पाणी डोळ्यांत साठवतात..... {३}

बाहूंची ती घट्ट मिठी
हलकासा स्पर्श अलवार
चांदण्यारातीत राजसा तू
जवळ घ्यायचास हळूवार..... {४}

हलके - हलके बुडायचो
आपण प्रणयाच्या डोहात
तुझे राजबिंडे, मोहक रूप
मला सदा पाडायचे मोहात..... {५}

छळते आजही मला
मंतरलेली ती रात्र
साजणाच्या सहवासाने
गंधाळलेली सारी गात्र..... {६}

अशीच राहावी तुझी साथ
राहू दे जन्मोजन्मीची प्रीत
एकांताच्या त्या धुंद क्षणी
तुझ्याचसाठी गाते प्रेमगीत..... {७}



डाॅ. बाबासाहेब आंबेडकर... Dr. Babasaheb Ambedkar... मराठी कविता


मना-मनावर कोरलेले ज्याचे नाव
जगात तोच परमपूज्य भिमराव... ॥धृ॥ 

असा महान लोकशाहीचा शिल्पकार                     
भारतीय संविधानाचा रचनाकार
दलितांसाठी ठेवला ममतेचा भाव... ॥१॥ 

काळाराम मंदिराचा सत्याग्रहकर्ता
चवदार तळ्याचा तो आंदोलनकर्ता
ज्याच्यामुळे गजबजले महाड गाव... ॥२॥

देशाच्या उद्धारासाठी झिजवली काया
दीन - दुबळ्यांवर केली अखंड माया
सोसले ज्याने सदैव अन्यायाचे घाव... ॥३॥


Tuesday, December 25, 2018

उघड्यावरचा संसार... मराठी कविता... Marathi Kavita... Marathi Poem


बघा मांडला संसार
निळ्या आभाळाच्या खाली
असा उघडा - बोडका
नाही घर, नाही वाली..... {१}

चंद्र - चांदणे पांघरू                                  
घेऊ नभाची चादर                                               
दुःख येता जीवनात
असू लढण्या सादर..... {२}

गरजेपुरती भांडी
अंग झाकाया कपडे
चिंता आमची देवाला
आम्ही गरीब - बापडे..... {३}

गुरे, वासरे सोबती
भटकंती होई नित्य
गरीबाला नाही कोणी
हेच आहे एक सत्य..... {४}

माया आईची न्यारीच
तान्ही मुले पदरात
अन्न मिळाया पोटाला
बाप राबे शिवारात..... {५}

अंधाराची नाही तमा
उन्हाळ्याच्या नाही झळा
नसे थंडीची काळजी
सोसू आनंदाने कळा..... {६}

नशीबाने जरी आम्ही
गरीबीत रे जन्मलो
तरी मनी निरंतर
आम्ही श्रीमंत जगलो..... {७}

सण नाताळाचा... Christmas... मराठी कविता... Marathi Poem... Marathi Kavita...


रंगीबेरंगी सण नाताळाचा
आप्तेष्टांना भेटायला जाऊ
नाताळ वृक्षाला सजवून
लहान मुलांना वाटूया खाऊ                                  

जोसेफ - मेरीचा पुत्र येशू
२५ डिसेंबरला जन्मला
प्रभू येशूच्या जन्मदिवशी
शांतीचा संदेश देऊया जगाला

सांताक्लाॅज आला भेटायला 
लहान मुलांना देतो शुभेच्छा
वेगवेगळी खेळणी, खाऊ देऊन
लहान मुलांच्या पूर्ण करतो इच्छा

झिरमिळ्यांनी सजला नाताळ वृक्ष
नाताळ सण आनंदाचा उत्सव
एकमेकांना शुभेच्छा देऊन
साजरा करू जल्लोषाचा महोत्सव

चर्चला करूनी रोषणाई
शांततेची मेणबत्ती पेटवूया
नाताळच्या या पवित्र दिवशी
प्रभू येशूला आपण स्मरूया




Sunday, December 23, 2018

भेगाळली भुई... मराठी कविता... Marathi Poem... Marathi Kavita...






भेगाळल्या या भुईची
तहान कशी भागावी ?
काळ्या मातीने तिची
कहाणी कशी सांगावी ?
                                                               
रोजच आटते, सुकते
नाही पाण्याचा थेंब
या भेगाळल्या भुईवर
कसा उगवेल कोंब ?

हवालदिल दिसे रोज
आपला शेतकरी राजा
पावसाविना तडपे रोज
ही नगरीतली प्रजा

सूर्य रोज ओकतो आग
उन्हाच्या झोंबतात झळा
आता तरी ये, वरूणराजा
किती सोसाव्यात कळा ?

पावसा, तू बरस ना
काळी माती तृप्त कर
हिरवीगार होऊ दे धरा
तू आभाळाचे छत्र धर

साधना... अभंग रचना... मराठी कविता... Marathi Poem... Marathi Kavita...


झालो रममाण । अनोख्या शक्तीत । 
विठ्ठल भक्तीत । एकरूप ॥१॥

सदा मुखी म्हणू । रामनाम गोड।
त्यास नाही तोड । अनंताची ॥२॥

हे मनमोहना । कैवल्य सागर ।
आनंद घागर । विश्वरूपी ॥३॥

सदैव पाठीशी । श्री स्वामी समर्थ ।
कार्य होई सार्थ । कृपेमुळे ॥४॥

बाप्पा गणराया । दे बुद्धीला गती ।
विवेकाची मती । सर्वांनाच ॥५॥

आजच्या दिवशी । योग हा घडावा ।
नित्यची करावा । परमार्थ ॥६॥

करते ही 'उमा' । अखंड साधना ।
जीवनी याचना । देवतांची ॥७॥


चेटकीण आणि मी... Witch... Marathi Poem... Marathi Kavita...


खूप खूप वर्षांपूर्वी 
होती एक चेटकीण दुष्ट
खूप म्हातारी होती तरी
तिला दिसायचे स्पष्ट..... (१)

चेटकीणीचे टोकदार नाक                                          
तिचे अक्राळविक्राळ कान
पिंजारलेले पांढरे केस बघून
भितीने हरपायचे सर्वांचे भान..... (२)

शाळेतून घरी आल्यावर मी
खेळून-खेळून खूप दमलो
म्हणून त्या दिवशी मी
अभ्यास न करताच झोपलो.....(३)

चेटकीण आली माझ्या घरी
तिने केले माझ्यावर चेटूक
मला बनवून टाकले मग
डराव-डराव करणारे बेडूक..... (४)

मग मला म्हणाली कशी ती,
"अभ्यास न करण्याची ही शिक्षा"
मला बुडवले तिने विहिरीत
आता कोण करेल माझी सुरक्षा ?..... (५)

डराव-डराव करतच मी
पूर्ण विहिरीत मारल्या उड्या
अशा जीवघेण्या शिक्षेपेक्षा
मास्तरांच्या बऱ्या वाटती छड्या..... (६)

माझे आई-वडील बिचारे
शोधून-शोधून झाले हैराण
कुठे गेला त्यांचा राजकुमार ?
पण चेटकीणीचे संपेना पुराण..... (७)

चेटकीणीने छडी फिरवून
त्यादिवशी बेदम झोडपले मला
म्हणाली, "नालायक, कार्ट्या..."
"अभ्यास करणे जमत नाही तुला"..... (८)

जादूच्या काचेच्या गोळ्यावर
तिने पुटपुटले काहीतरी मंत्र
त्याचबरोबर पडला पिवळा प्रकाश
समजेना तिचे विचित्र तंत्र..... (९)

गयावया करून चेटकीणीच्या
शेवटी मी पडलो तिच्या पाया
ही.. ही.. करून हसली ती
पण तिला आली नाही दया..... (१०)

डराव-डराव करून मी
मागितली चेटकीणीची माफी
लगेच झालो मी शहाणा मुलगा
आईने लाडाने दिली मला टाॅफी..... (११)

त्या दिवसानंतर मी
अभ्यास केला कसून कंबर
सर्व गणिते सोडवली पेपरात
आला परीक्षेत पहिला नंबर..... (१२)






Friday, December 21, 2018

महादेव... Mhadev... मराठी कविता... Marathi Poem... Marathi Kavita...


कधी ना समजतो, कुणालाही जो हीन
त्या महादेवाच्या चरणी, मी होते लीन... ||धृ||


तोच पार्वतीचा पती, गणेशाचा पिता                          
त्याच्या जटेतून उगमली गंगामाता
जटाधारी त्या शिवशंभूला नेत्र तीन... ||१|| 


तोच मायावी राक्षसांचा संहारकर्ता                       
या ब्रह्मांडाचा तोच, कर्ता नी करविता
ठेवतो घट्ट जो, नातेसंबंधांची वीण... ||२|| 


शंकरामुळे सुखाचा जीवनप्रवास
मिळतो सगळ्यांना रोज सुखाचा घास

जगी राहू देत नाही, कुणाला जो दीन... ||३||


सागरी तट... Seashore मराठी कविता... Marathi Poem... Marathi Kavita...



सागरी तट
निळाशार अथांग
कळेना थांग................(१)

                                                                              
समुद्री लाटा
गर्जतात खळाळा
भिजल्या वाटा.............(२)


मगर - मासे
विहरती स्वच्छंद
मनी आनंद.................(३)


माडाची झाडे
विस्तीर्ण डेरेदार
सदाबहार...................(४)


सूर्य बुडता
वाळूवर रुपेरी
क्षण सोनेरी..................(५)

अंधाऱ्या रात्री... मराठी कविता... Marathi Poem... Marathi Kavita...


आनंदी यात्री
  चांदण्यात फिरतो
    अंधाऱ्या रात्री.....(१)


ताऱ्यांच्या रांगा                                                   
  आकाशात दिसती
     आकाशगंगा.....(२)


मिट्ट काळोखी
  चाले ताऱ्यांचा खेळ
     जमला मेळ.....(३)


वाजे संगीत
   प्रणयात डुंबूया
     नभ रंगीत.....(४)


मिलनासाठी
   आतुरली साजणी_
      चंद्र-चांदणी.....(५)


गुलमोहर... Gulmohar... मराठी कविता... Marathi Poem... Marathi Kavita...


गुलमोहर
मनावर कोंदण
भरे अंगण                                            


पडली फुले
गर्द केशरी लाल
निसर्ग ताल


उन्हाच्या झळा
मनाला भुलवती
फुलांच्या माळा


करू रिंगण
गुलमोहर फुले
नाचती मुले


सडा केशरी
हिरवीगार पाने
आनंदी मने






पळस फुले... मराठी कविता... Marathi Poem... Marathi Kavita...


पळस फुले
पसरे लाल रंग
वाऱ्यात डुले...१ 


हिरवी धरा                               
डौलदार पळस
सृष्टी कळस...२


निळे आकाश
धगधगती आग
सांज प्रकाश...३


आवडे ऋतू
आला बघा वसंत
मनपसंत...४


दाट रानात
फुलला हा पळस
हर्ष मनात...५





तृणाचे पाते... मराठी कविता... Marathi Poem... Marathi Kavita...


तृणाचे पाते
निसर्गाशी जोडते
अल्लड नाते                                   



दवबिंदूंची
हिरवी तृणपाती
ओल्या सरींची



काळ्या मृदेत
तृण जगते छान
धुंदी हवेत



गंध पसरे
तृणाचा शिवारात
पाडे मोहात



थरथरते
तृणपाते हिरवे
लवलवते




डोंगर रांगा... मराठी कविता


धुक्याची शाल
डोंगराला वेढते
मन मोहते.....(१)


डोंगरावर                                     
धुके दाटले गर्द
मौसम सर्द.....(२)


डोंगर रांगा
चिवचिवती पक्षी
सुंदर नक्षी.....(३)


नदी उगम
डोंगराच्या कुशीत
जल सुगम.....(४)


ढग जमले
डोंगर रांगांवर 
पक्षी रमले.....(५)



Tuesday, December 18, 2018

वृक्षांची थोरवी... Importance of trees मराठी कविता Marathi Poem Marathi Kavita


फळे, फुले, पाने
देती आम्हां वृक्ष
या वृक्षांशिवाय                          
जीवन हे रूक्ष..... १


                 
पाऊस पडतो                              
झाडांमुळे फक्त
वृक्ष तोडण्याची
बंदी करू सक्त..... २



वृक्ष सदा देई
घनदाट छाया
सर्व झाडांवर
चला करू माया..... ३



प्राणवायू शुद्ध
मिळतो जगाला
थोरवी वृक्षांची
सांगूया जनाला..... ४



वृक्ष थांबविती
जमीनीची धूप
साऱ्यांनी मिळून
झाडे लावू खूप..... ५



थोरवी झाडांची
गाते रोज 'उमा'
वृक्ष देवराया
चुकीला दे क्षमा..... ६ 





सुगरणीचा खोपा... मराठी कविता


इवली चोच
छान बांधते घर
झाडाच्या वर.........{१}

छोटेसे हात                                        
काम करती खूप
पालटे रूप........... {२}

विणला खोपा
कलात्मक विणीने
सुगरणीने............. {३}

आभाळ खुले
वर सुगरणीने
बांधले झुले........... {४}

पिल्लू निजले
सुंदरशा महाली
स्वप्न सजले........... {५}

Monday, December 17, 2018

वेश्या... Prostitute मराठी कविता

 
आहे बंधने जातीला
तरी वेश्या माझी जात 
वेश्या म्हणूनी जगते
संकटाला देते मात... ||१||
 

रात्री करूनी ग्राहक                                        
दाह रात्रभर सोसे
दिसे उशीत माझ्या
वेदनेचे हे उसासे... ||२||
 

आहे रात्रपाळीला मी
सौंदर्याचे मायाजाल
रचे गिर्हाईक जो तो
माझ्या स्वप्नांचा महाल... ||३||
 

कमवूनी साठवते
पैसा कुटुंबाच्यासाठी
झटे रात्रंदिवस मी
माझ्या या माणसांसाठी... ||४||
 

'आई' म्हणूनी बिलगे
माझं लहान लेकरू
त्याच्यासाठी डोळ्यांतून
वाहे सुखाचा सागरू... ||५||
 
 

हुंडाबळी... मराठी कविता


कुठे नेऊन ठेवला समाज ?
असा कसा ढासळला तोल
कधीतरी समजून घ्या हो
लेकीच्या आयुष्याचे मोल... ||१||



मुलास नाही काही कामधंदा                  

तरिही हवा भरघोस हुंडा
पाच लाख रूपये मागतो
नवरा दिसे जरी गावगुंडा... ||२||


आत्महत्या करूनी घेतला
माझ्या लेकीचा तुम्ही बळी
अजून किती जणींचा आता
तुम्ही घेणार हो हुंडाबळी ?... ||३||



समाजाचे चित्र विदारक
हुंड्यासाठी करतो छळ
कोंडूनी नवरा मारतो
बाईच सोसते सारी झळ... ||४||



सासरचे डावलती लेकीला
मोडती संसार सुखाचा
विष पिऊनी जीवन संपते
प्राशन करे घोट दुःखाचा... ||५||



हुंडा देऊ नका तुम्ही
हुंडा घेऊ नका कुणी
न्याययंत्रणेने द्यावी शिक्षा
बंद करूयात प्रथा जुनी... ||६||


लग्नसोहळा... मराठी कविता


जोडूयात आपण नाते
धरती आणि अंबराचे
नकोत वाद कोणतेही
भार कशाला आभाराचे... ||१|| 



जपूयात क्षण अन् क्षण                                      

देऊ सर्वांना स्थान आदराचे
सुखी एकत्र नांदुयात
भार कशाला आभाराचे... ||२||


एकमेकांशी जोडली मने
जगतो जीवन आनंदाचे
सुखी एकत्र नांदुयात
भार कशाला आभाराचे... ||३|| 



रंगला आज लग्नसोहळा
द्या दान आशीर्वादाचे
टाका अक्षता फुलांच्या
भार कशाला आभाराचे... ||४||



सर्व उपस्थित लोकांचे
करू स्वागत आनंदाचे
देऊयात भेट प्रेमाची
भार कशाला आभाराचे... ||५||



पाळला शब्द अन् शब्द
वचन निभावले जीवनाचे
साथ राहावी नेहमीच
भार कशाला आभाराचे... ||६||


दिवस गुलाबी थंडीचे... मराठी कविता


हे दिवस गुलाबी थंडीचे
मृदू नि मुलायम बंडीचे
पेटवू शेकोटी, शेकू हात
चला करू आनंदाची बात... ||१||

फुला-फळांना बर्फाची शाल                             
सफरचंदाचे लाल गाल
रात्र फार, दिन झाले कमी
ही तर आहे थंडीची हमी... ||२||

तीळगुळाचा आला हा सण
पतंग उडवू, भरू मन
हुडहुडीने अंगी रे काटा
या धुक्यात हरवल्या वाटा... ||३||

आसमंती पसरले धुके
थंडीपुढे शब्द झाले फिके
उबेच्या मिठी प्रेमीयुगुल
एकमेकांत झाले मश्गूल... ||४||

गुलाबी थंडीत, हातात हात 
होऊ द्या प्रेमाची बरसात
पांघरू स्वेटर आणि शाल
थंडीत जीवाचे असे हाल... ||५||
 
जानेवारीत थंडीचा ताफा
थंडीत तोंडी येती रे वाफा 
चला ओढू थंडीची चादर
येता थंडी असावे सादर... ||६||

बाप आणि मुलगी... Father and Daughter मराठी कविता

एके दिवशी आयुष्यात
सुखाचा आला क्षण
'बाप' झालो होतो मी
लेकीमुळेभारावले मन ||१||                         



इवलीशी ती गोंडस                           

धावते कशी दुडूदुडू
गाल गोबरे फुलवूनी
हसते कशी खुदूखुदू ||२||


आम्हां बाप आणि मुलीचे
आहे बघा सुंदरसे नाते
जणू हिरव्या फांदीवर
असते लवलवते पाते ||३||



कठोर जरी असतो चेहर्याने
तरी बापाचे काळीज मऊ
लेकीच्या सुखासाठी बाप
आता अंगाई लागला गाऊ ||४||



मुलीला पाठवता सासरी
डोळ्यांतून तरळला भाव
बापाच्या डोळ्यांत नेहमी
दिसतो स्वप्नांचा गाव ||५||




ऋतूंचा सोहळा... मराठी कविता

फिरते कालचक्र नित्य 
होते दिवस आणि रात्र
युगामागुनी युगे जाती
ऋतूंचे चाले नियमित सत्र 
         
पूर्वेला उगवे दिनकर 
अंधारात दिसे चांदणे 
धरतीने कोरली अंगावर 
पावसाची सुंदर गोंदणे 

ऋतूमागूनी येत असे ऋतू
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा
सगे - सोयरे सर्वच आपले 
सर्वांशीच माणसाचा जिव्हाळा 

उन्हाळ्यात आहे ऊन खूप 
पावसाळ्यात बरसे धारा 
हिवाळ्यात गोठते अंग 
सर्व ऋतूंत नित्य वाहे वारा 

वर्षभर अखंड चालला
नयनरम्य ऋतूंचा सोहळा 
सजला निसर्ग मनोहारी 
सृष्टीचा रंग वेगवेगळा 

तिचा सहवास... मराठी कविता

अवचित घडले काही
माझा मी न राहिलो
ती काळजात भिडली
मी ही तिचा जाहलो... ||१||



येता ती माझ्या समीप                                

पूर्ण गुंतलो तिच्यात
थोडेच उरले अंतर
तिच्यात नि माझ्यात... ||२||


बोलली असे काही
उडूनी गेले होश
सहवास तिचा घडता
जीवनी झालो मदहोश... ||३||



अंगी ती बिलगता
सुचती ना मला अक्षरे
कोरली समुद्री वाळूवर
आमच्या प्रेमाची प्रेमाक्षरे... ||४||



येता मिलनाची घडी
मनात वाढे हूरहूर
एकांताच्या या क्षणांचा
जीवनी आनंद भरपूर... ||५||



तीच मौल्यवान प्रेम
तीच ह्रदयाचा हुंकार
ओबडधोबड जीवनाला
तिच्यामुळे मिळे आकार... ||६||



बीज आमच्या प्रेमाचा
तिच्या कुशीतून अंकुरला
सोबतीत तिच्या माझा
सुखी संसार फुलला... ||७||




आई... Mother... मराठी कविता


माझी आई
दुधावरची आहे साय
लेकराची माय
अलवार...

                                                       
आई म्हणजे,
सुखाचा शांत सागर
मायेची घागर
प्रेमळ...

अगं आई,
तूच माझी प्रेरणा
तुझ्यात करूणा
ममतेची...


रडता तू,
डोळे माझे पाणावतात
तुलाच खुणावतात
अश्रूंनी...


जगण्याचा आदर्श
जन्मोजन्मी लाभावी साथ
आश्वासक हात
उबदार...






पाणी वाचवा... save water मराठी कविता


धरतीचे पुत्र
आपण पाणी वाचवू
जीवन जगवू
लोकांचे...



थेंबाथेंबाने साठवू                           

पाणी पशु, पाखरे
हिरवीगार शिवारे
जलमय...


धरणे बांधून
आपण पाणी अडवूया
पाणी जिरवूया
शेतीसाठी...



पाणी अनमोल
राष्ट्राची साधन संपत्ती
पाण्याविना आपत्ती
ओढवते...



पुढच्या पिढीसाठी
वाचवून ठेवू पाणी
आनंदाची गाणी
गाऊयात...




गरज पुस्तकांची... मराठी कविता


मोबाईल आवडतो मज
इंटरनेटच वापरतो फक्त
या तंत्रज्ञानाच्या युगात मी
केली पुस्तकांना मनाई सक्त //१//



झोप नाही मला आरामाची                              

सतत चिडचिडतो जीव
राहतो उदासवाणा सदा
माझ्या घरचे करतात कीव //२//


पुस्तकांची जागा आता
नवीन गॅझेट्स ने घेतली
अप्रतिम पुस्तकांवर आता
गड्या, धूळ बसू लागली //३//



तीच धूळ बुद्धिला चिकटली
झाली माणसाची बुद्धी भ्रष्ट
चांगले विचार नाहीत डोक्यात
माणूस विसरला बुद्धीचे कष्ट //४//




पुस्तके आहेत माणसाचे खाद्य
चांगल्या विचारांना मिळे बळ
होईल प्रशंसा प्रत्येक ठिकाणी
जीवनात सुखाचा येईल काळ //५//



उठ माणसा, जागा हो
तुला पुस्तकांची गरज
नाहीतर तू, बनशील बघ
इंटरनेट जाळ्याचे सावज //६//


महाराष्ट्र भूषण... अभंग रचना मराठी कविता





तुका अभंगाची गाथा । रामदासा पायी माथा ।
चोखामेळा आणि नाथा । ही संतपरंपरा ॥  १



स्वामींचे श्लोक मनाचे । होई कल्याण जनाचे ।
नको सोहळे तनाचे । तो रामदास सांगे ॥  २



द्यावे सर्वांनी वचन । परंपरेचे जतन ।
संत असती रतन | महाराष्ट्र भूषण ॥  ३



जगी हीच असे रीत । आपुलीच व्हावी जीत ।
सर्वांचे साधूया हीत । सकल मनुजांचे ॥  ४



विठ्ठलाची करू भक्ती । विठुराया देई शक्ती ।
विठुनामे मिळे मुक्ती । सर्व पशु-प्राण्यांना ॥  ५



नामस्मरणाची आस । कृष्णभक्ती माझी खास ।
चराचरांत सुवास । चंदन दरवळे ॥  ६



वारकरी चाले पायी। पांडुरंगाच्या रे ठायी ।
पुजूयात बैल, गायी । थोर परंपरेत ॥  ७



आहे महाराष्ट्र थोर । इथले हुशार पोर ।
प्रत्येकाच्या ठायी जोर । विजयी होण्यासाठी ॥  ८



राहिल तोचि रे सुखी । देव नाम ज्याच्या मुखी ।
नसेल कोणीही दुःखी । प्रार्थना करूयात ॥  ९



उजळती लक्ष ज्योती । गुंफू प्रीतीचिये मोती ।
जोडू प्रेमबंध नाती । एकमेकां साथीने ॥  १०



जयजयकार करू । जरी जिंकू किंवा हरू ।
राष्ट्रासाठी आम्ही मरू । हेचि 'उमा' म्हणते ॥  ११