हे नारी, तू बनलीस बाई
आता बनून बघ आई... ॥धृ॥
तू हाती घेतली ढाल जरी
तुझ्या कर्तृत्वाने उजळल्या दिशा
तरी सदैव फुटतो ममतेचा पाझर
बाळाला जन्म देण्याची कर घाई... ॥१॥
शिकावे तुझे बाळ आनंदाने
कर्तृत्व गाजवून व्हावे महान
कितीही मोठा झाला बाळ तरी
आईसाठी सदैवच असतो लहान
बाळास निजवतांना ती अंगाई गाई... ॥२॥
कितीही कष्टली जरी आई
तरी बापाचेच होई गुणगान
म्हणून नेहमीच देऊयात सर्व
आपण आईलाही मान, सन्मान
आई माझी जशी सुगंधी जाई... ॥३॥
वात्सल्याची ओतप्रोत घागर तू
बोचऱ्या थंडीतली उबदार चादर
कुटुंबासाठी झिजवते स्वतःला
तुझ्यामुळे सुखी होते पूर्ण घर
प्रेमाने म्हणतात तुला सारे माई... ॥४॥
आई, तू जगावीस हजारो वर्षे
तुझी माया अखंड मिळावी
करते प्रार्थना भगवंताकडे
जन्मोजन्मी हीच आई लाभावी
आईच्या सर्व इच्छा पूर्ण कर, साई... ॥५॥
सर्व असूनही ज्याला नाही आई
बिचारा तो मनुष्य वाटतो अधुरा
अथांग, अफाट आहे महती आईची
आभाळाचा कागद पडतो अपुरा
तिचे गोडवे गातांना पुरत नाही शाई... ॥६॥
No comments:
Post a Comment