विद्रोह म्हणजे ज्वलंत
जळजळती आग...
समाजातील नेहमी खदखदणारं
एक वास्तव...
मुक्या भावनांनी न राहता
समाजाला अन्यायाविरूद्ध जागं करणं,
नुसतंच जागं करणं नाही,
तर त्या अन्यायाविरूद्ध
लढायला लावणं,
तोंड दाबून न ठेवता
वाट्याला जे आलं
ते उघडपणाने सांगणं...
आपल्या हक्कांसाठी,
आपल्या विचारांसाठी,
न्याय मिळवण्यासाठी,
समाजात जगता यावं यासाठी,
आपल्या गरजांसाठी,
शेवटच्या श्वासांपर्यंत
लढा देणं म्हणजे विद्रोह...
निसर्गावरच्या,
प्रेमावरच्या,
सुंदरतेच्या,
खोट्या, बेगडी कविता न लिहीता
समाजाचं
भान ठेवून लिहिणं
म्हणजे विद्रोह...
जाती-पातीच्या राजकारणावर,
सरकारवर,
दंग्यांवर,
दंगे करणाऱ्यांवर,
कट रचणाऱ्यांवर,
अफवा पसरवणाऱ्यांवर
सडेतोडपणाने ताशेरे ओढणं
म्हणजे विद्रोह...
इतके असंख्य रंगाचे झेंडे,
पण त्या झेंड्यांमधल्या
खऱ्या विचाराला जाणून घेऊन
योग्य विचार स्विकारणं,
अयोग्य विचारांना धिक्कारणं
म्हणजे विद्रोह...
गुळगुळीत,
बुळबुळीत,
छान,
सुंदर,
अप्रतिम...
अशी बेगडी विशेषणे न लावता
सत्य परिस्थितीबद्दलचे मत मांडणं
म्हणजे विद्रोह...
मित्रा,
ही एवढीच नाही फक्त
विद्रोहाची व्याख्या...
विद्रोह म्हणजे काय ?
हे समजण्यासाठी अन्यायाबद्दल
असावी लागते चीड...
तेव्हाच तर कापली जाईल
मग चुकीच्या गोष्टींबद्दल भीड...
विद्रोहाची धगधगती मशाल
पेटती ठेवावी लागेल
तुझ्या मनात...
तेव्हा,
तू ही वावरू शकतील
उजळ माथ्याने
भारत नावाच्या या देशात...