Tuesday, January 29, 2019

नैराश्य समजून घेताना... मराठी लेख... Depression...



              काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर एक व्हिडीओ पाहण्यात आला होता. त्यात असे सांगितले होते की, रात्री झोप लागण्यापूर्वीची 10 मिनिटे माणूस जे-जे विचार करतो, तेच विचार सकाळी उठल्यानंतर पूर्ण दिवसभर तो करत राहतो. म्हणजे, समजा माणसाने झोप लागण्यापूर्वीची 10 मिनिटे नकारात्मक विचार केला असेल, तर त्याच्या नव्या सकाळची सुरूवात नकारात्मक विचारानेच होते. एकदा का नकारात्मक विचाराने दिवस सुरू झाला, तर पूर्ण दिवसभर डोक्यात तेच विचार राहतात आणि रात्री झोप लागण्यापूर्वीची 10 मिनिटे सुद्धा ते विचार पाठ सोडत नाही.


             नकारात्मक विचार म्हणजे एखाद्या व्यसनासारखे असतात. ते व्यसन आपल्याला कधी लागलं हेच कळत नाही. जेव्हा कळतं, तोपर्यंत आपण त्यात पूर्णपणे अडकून गेलेलो असतो. वाईट सवयींतून चांगल्या सवयींकडे जाण्याचे मार्ग आहेतच. पण माणसाला ते कळायला हवेत. सर्वात आधी तर हे कळायला हवं की, आपण नैराश्याने घेरलेलो आहोत. एकदा का कळले, मग त्या नैराश्यावर मात करणे सोपे होते. नैराश्य हे कोणालाही येऊ शकतं. कोणालाही अगदी कोणालाही. बाॅलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री दिपिका पादुकोण सुद्धा नैराश्याची शिकार झाली होती. तिच्या आयुष्यात वैफल्यग्रस्तता इतक्या प्रमाणात भरली होती, की ती कोणते काम करते आहे, हेच तिला कळत नव्हते. शूटींग दरम्यान अचानक अश्रू येणं ती खुबीने लपवायची. या जगात आपलं कुणीच नाही असं वाटणं, एकटेपणाच्या भावनेने घेरणं, मरून जावंसं वाटणं या सर्व गोष्टींमधून ती सुद्धा गेली आहे. मग तिच्या आयुष्यात असं काय घडलं की, ती या सर्व गोष्टींमधून बाहेर पडू शकली ? याचे उत्तर आहे 'काउंन्सलिंग' म्हणजे 'समुपदेशन'. 
लोकं मानसोपचार तज्ञाकडे जायला घाबरतात. कारण, त्यांना वाटते की, आपण वेडे आहोत की काय?, लोकं काय म्हणतील ?, लोकांनी आपल्याला वेडं ठरवलं तर?  या बदनामीच्या भीतीमुळे मानसोपचार तज्ञाचा सल्ला घेतला जात नाही. समुपदेशनाने फारसा फरक पडत नाही, असेही काही लोकांना वाटते. पण ते चुकीचे आहे. मानसोपचार तज्ञांनी दिलेल्या सकारात्मक विचारांचा नक्कीच फायदा होतो. माणसाच्या आयुष्यात नक्कीच बदल होतो. माणसाचे नकारात्मक विचार कात टाकतात आणि सकारात्मक विचार जीवनात यायला सुरूवात होते. सकारात्मक विचार ही यशाची पहिली पायरी आहे.


              कामाचा प्रचंड ताण असल्यामुळे अनेक मोठं-मोठ्या कलाकारांना नैराश्य येते. मोठ्या लोकांच्या बातम्या होतात, म्हणून आपल्याला कळते तरी. पण ज्या लोकांच्या बातम्या होत नाही, अशा सर्व सामान्य माणसाबद्दल कळणार तरी कसे ? सर्व सामान्य माणसाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास त्याच्या नातेवाईकांना सतर्क राहावे लागते. आपल्या आजूबाजूचा एखादा व्यक्ती सतत नकारात्मक बोलतो का ?, त्याला मरून जावेसे वाटते का ?, त्याचे मूड सतत बदलतात का?, आनंदाच्या प्रसंगी सुद्धा तो दुःखात असल्यासारखा वाटतो का ?, एखादा व्यक्ती लोकांमध्ये मिसळायला घाबरतो का ? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांमधून आपल्याला माहिती मिळू शकते. पण सगळ्यात आधी आपल्याला नैराश्य आलं आहे, हे कळणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.


               कोंबडं झाकलं म्हणून तांबडं फुटायचं राहत नाही. चेहऱ्यावर कितीही हसू ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही नैराश्याची भावना जास्त वेळ लपू शकत नाही. मनातली चिंता कधी ना कधीतरी बाहेर येतेच. भावनांचा कधीतरी उद्रेक होतोच. आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींवर लक्ष ठेवायला हवे. आपल्या स्वतःवर लक्ष ठेवायला हवे. कोणत्या व्यक्तीचं फेसबुक, व्हाॅटस् अपचे स्टेटस काय आहे, या वरूनही त्या व्यक्तीची मनःस्थिती कळते. सगळ्यात आधी आपण नैराश्यात आहोत, हे कळायला हवे. आपण नैराश्यात आहोत या भावनेला स्वीकारायला हवे, त्यानंतरच पुढे पाऊल टाकणे सोपे जाते.

No comments:

Post a Comment