Tuesday, May 28, 2019

पेरणी... Farming... Marathi Kavita... Marathi Poem...मराठी कविता

 
 
 

 
केली पेरणी पेरणी
काळ्या शेतामध्ये छान
पंढरीच्या विठूराया
द्यावे पावसाचे दान..... ॥१॥
 

माझे ढवळ्या-पवळ्या
संगे चिमणी-पाखरं
गाणे गातात मस्तीने
सारी माझीच लेकरं..... ॥२॥
 

काळ्या-काळ्या ढेकळांना
लागे पावसाची आस
तरी कोसळेना नभ
फक्त होतसे आभास..... ॥३॥
 

यावे वरूणाने आता
बीज सुकायच्याआधी
द्यावे भरपूर पाणी
कोंब अंकुरण्याआधी..... ॥४॥
 

शेतामध्ये पसरला
सारा कष्टाचाच घाम
अवंदाच्या वर्षी तरी
मिळो मनाजोगा दाम..... ॥५॥
 

कष्ट करून जोमाने
पुन्हा फुलावे शिवार
काळ्या आईच्या कुशीत
सारे भिजावे आवार..... ॥६॥
 

यावा मृग लवकर
जावी मोहोरून शेती
याव्या पावसाच्या धारा
ओली व्हावी काळी माती..... ॥७॥
 
 
 
 

1 comment: