Saturday, February 23, 2019

गडकिल्ले... मराठी कविता... Marathi Poem... Marathi Kavita...




राजा शिवाजीच्या पदस्पर्शाने
मराठी माती झाली पावन
गडकिल्ल्यांच्या सम्राटाला
जयंतीदिनी करतो नमन... [१]

असंख्य किल्ले, अनेक गड
मराठी मुलूखाची बातच न्यारी
चला करूया रक्षण इतिहासाचे
जपूया ही वैभव संपदा सारी... [२]

महत्त्व जाणावे गडकिल्ल्यांचे
इतिहासावर नित्य करावा गर्व
ऐतिहासिक इमारती सांभाळून
सर्व मिळून आणूया नवे पर्व... [३]

पाण्यातला किल्ला जलदुर्ग
किल्ल्याची भक्कम तटबंदी
भूमीवरचा भुईकोट किल्ला
दुश्मनांना करतो जायबंदी... [४]

नावे कोरू नये किल्ल्यांवर
गडकिल्ल्यांचे संरक्षण करावे
समृद्ध इतिहासाची साक्ष ठेवून
शूरवीर, थोर राजांना स्मरावे... [५]

फेकणार नाही कचरा किल्ल्यांवर
कचरा कचरापेटीतच टाकू
चला घेऊ शपथ सर्व मिळून
आई, बाबा, काका, काकू... [६]

काही विचित्र प्रवृत्तीची लोकं
दारू पिऊन धिंगाणा घालतात
तेथे नवीन वर्षाची पार्टी करून
किल्ल्याचे पावित्र्य नष्ट करतात... [७]

दुष्ट प्रवृत्तीच्या इसमांना
द्यावे पोलिसांच्या हवाली
गडकिल्ल्यांवर सांजसमयी
सुविचारांच्या पेटवू मशाली... [८]

मराठी मातीचा लावून टिळा
जपून ठेवू अमूल्य ठेवा
समृद्ध परंपरा भारताची
गडकिल्ल्यांचा करू हेवा... [९]

निसर्ग हाच आपला देव
निसर्गाकडे करूया प्रार्थना
गडकिल्ल्यांचे संवर्धन करून
पराक्रमी वीरांना देऊ मानवंदना... [१०]



No comments:

Post a Comment