नशील्या धुंद रात्रीच्या, किती कैफात आहे मी
गुलाबी गोड ओठांच्या, पुन्हा प्रेमात आहे मी
वृथा तू शोधिसी वेड्या, मला देवालयामध्ये
इथे साऱ्यात आहे मी, तुझ्या हृदयात आहे मी
फुलांचा माळुनी गजरा, किती करतेस तू नखरा
तुझ्या नखऱ्यात आहे मी, धवल गजऱ्यात आहे मी
नकोश्या वर्तमानाची, जरी जाणीव झालेली
असे का वाटते अजुनी, मला स्वप्नात आहे मी
अणू-रेणूंत आहे मी, नि प्रत्येकात आहे मी
दिवसभर राबणाऱ्या या, तुझ्या हातात आहे मी
कशी तोऱ्यामधे म्हटली, तिला मी फोन केल्यावर
तुझ्याशी बोलते नंतर, जरा कामात आहे मी
हरपली भूक अन् तृष्णा, सुचत नाही नवे काही
अता माझे मला कळले, किती व्यापात आहे मी
कधी काळी निघत होता, म्हणे तो धूर सोन्याचा
प्रदूषित जो अता झाला, अशा देशात आहे मी
जगाची ना तमा उरली, जणू स्वर्गात आहे मी
सख्या रे घट्ट बाहूंच्या, तुझ्या विळख्यात आहे मी
कुठे आहे ?, कशी आहे ?, जशी आहे, तशी आहे
नव्या ध्यासात आहे मी, तुझ्या श्वासात आहे मी
जरी गझला नव्या लिहुनी, सरवली सर्वही पाने
मला ठावूक आहे की, तरी कचऱ्यात आहे मी