Friday, November 30, 2018

म्हातारी ( कथा )



म्हातारी ( कथा )





एक म्हातारी सुरकुतलेल्या चेह-याची. रापलेल्या कातडीची. तिच्या हातातून हिरव्या नसा स्पष्ट दिसायच्या. पण तिला त्याची पर्वा नव्हती. फाटकंच लुगडं नेसून ती बसलेली असायची. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असल्या तरी त्या सुरकुत्यांमधून आडमुठेपणाची भावना बघणाऱ्याला स्पष्ट जाणवायची. कदाचित तिच्या याच हट्टी आणि आडमुठेपणाच्या स्वभावामुळे तिच्या मुलाने तिला घराबाहेर हाकलून दिले असावे. आपण असे म्हणतो की, ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर ठेवणे हे चुकीचे आहे. पण काही ज्येष्ठ नागरिकच जर चुकीचे वागत असतील, तर काय करावे ? कदाचित मुलाशी, सुनेशी न पटल्यामुळे तिला घराबाहेर काढले असावे.


मी जेव्हा बाजारात भाजी खरेदीसाठी जायचे, तेव्हा ती म्हातारी तिच्या त्या खोल गेलेल्या डोळ्यांनी बघत राहायची येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे. तिच्या डोळ्यांत कधीच निराशा जाणवली नाही. तिच्या त्या बारीक डोळ्यांतही जगण्याची उमेद दिसायची. तिचे घर म्हणजे एक मोडका ढकलगाडा. त्याच मोडक्या ढकलगाड्यावर तिचा एकटीचा संसार होता. त्या गाड्यालाच म्हातारीने तिची एक फाटकी साडी गुंडाळली होती. त्या साडीच्या आडोशामुळे म्हातारीला कुणी पाहू शकत नव्हते. पण म्हातारी मात्र त्या साडीच्या पडद्यातून सर्वांना निरखत असायची.


म्हातारीचा संसार म्हणजे एक मडके, एक मातीची चूल, दोन-चार मोडकी भांडी, दोन लुगडे, दोन पोलके एवढाच होता. म्हातारीला कधी आरसासुद्धा नको होता. कारण, तिला त्याची गरजच नव्हती. सतत-सतत आरशात डोकावायला तिच्याकडे रूप होतेच कुठे ? म्हातारीकडे जर आरसा असता, तरी तिने स्वतःचे रूप आरशात न्याहाळून पाहिलेच असते असे नाही ! तिला तिच्या दिसण्याची काहीही पर्वा नव्हती. पण तिला तिच्या जिंदगीची काळजी होती.


म्हातारी निरक्षर होती. म्हणून तिच्याकडे असलेल्या थोड्याफार पैशामधून लोकांकडून सांगून ती तेल, मीठ, हळद, तिखट वगैरे खरेदी करत असेल. म्हातारी काहीतरी खाऊन दुपारी त्या गाड्यावर बसलेली असायची. मी तिच्या समोरून गेल्यावर ती माझ्याकडे बघायची. मी ज्याप्रमाणे तिला निरखत असायचे, त्याचप्रमाणे ती सुद्धा माझे निरिक्षण करायची. म्हातारी जेव्हा माझ्याकडे पाहत असेल, तेव्हा तिच्या मनात माझ्याबद्दल काय विचार येत असतील कुणास ठाऊक ? पण माझ्या मनात मात्र तिच्याबद्दल भरपूर विचार यायचे. मी कधीही त्या गाड्याजवळ गेली तर मला ती म्हातारी तिथेच बसलेली दिसायची. म्हातारीच्या मूलभूत गरजासुद्धा पूर्ण होत नव्हत्या. पण तरी तिने जगण्याची उमेद कधीच सोडली नाही. ती कुणाशी फारशी बोलताना वगैरे कधी दिसली नाही. ती स्वतःतच गुंग असायची. तिचाच विचार करत.


मी सुद्धा भाजी खरेदीला बाजारात नियमित जात असे आणि ती म्हातारी मला दिसत असे. असेच दिवस जात होते. आपण लोकांचा विचार करतो आणि घरी आल्यावर त्यांना विसरूनही जातो. मी कामानिमित्त १०-१२ आठवड्यांसाठी बैंगलोरला गेले होते. तिथे बैंगलोरी कल्चर अनुभवत मी घरच्या सर्व आठवणी विसरत चालले होते. काही दिवसानंतर घरी परत आल्यावर भाजी आणायचे काम मलाच करावे लागले. त्या दिवशी त्या ढकलगाड्याजवळ चार-पाच माणसे काही बोलतांना दिसली. मी तेथे गेल्यावर मला म्हातारी झोपलेली दिसली. मला वाटले, म्हातारीला बरे नसावे पण ती माणसे म्हातारी मरून गेल्याबद्दल बोलत होती. ती माणसे तिच्या अंत्यविधीची तयारी करत होती.


काही माणसे आपल्याशी बोलत नाहीत, पण तरीही आपल्याकडे पाहात राहतात आणि आपल्या मनात खोलवर कुठेतरी आठवणीत साठून राहतात. आजही मी जेव्हा, तो रिकामा ढकलगाडा पाहते तेव्हा मनात वाईट वाटतं. 

रस्ता एकाच जागी असतो कायमचाच. पण त्या रस्त्यावरून येणारे जाणारे प्रवासी बदलत असतात. येणाऱ्या- जाणाऱ्यांना मार्ग दाखवणे, हे रस्त्याचे काम. काही बरोबर मार्गाने जातात तर काही चुकीच्या मार्गाने. अंधार पडल्यावर सुद्धा गुडूप वातावरणात रस्त्यावरची मात्र रहदारी चुकत नाही. रस्त्यावर काही ओळखीची माणसे भेटतात, तर काही अनोळखी माणसे भेटतात. काही माणसे आपल्याकडे बघून स्मित हास्य करतात, तर काही करत नाही. रस्त्यावर एवढी वर्दळ असूनही रस्ता स्थिरच असतो. तो जागचा हलत नाही. एखाद्या वाटसरूला माझ्यावर चालू नकोस, माझ्या कडेला बसू नकोस, झाडाखाली उभा राहू नकोस असे तो काहीही सांगत नाही. एखाद्या पांथस्थाला रस्ता वेडी-वाकडी वाट कधीही दाखवत नाही. स्वतः योग्य दिशेने जा आणि दुसऱ्यांनाही योग्य दिशा दाखवा, हेच रस्ता सांगतो. जीवनात कितीही संकटे आली, तरी प्रत्येक संकटाला तोंड देऊन धैर्याने पुढे चालत राहावे, हेच तर आपल्याला रस्ता शिकवतो. 




Wednesday, November 28, 2018

ऊबदार थंडी... ( हायकू )



                

















गुलाबी थंडी
करू मौज थंडीची
मऊ बंडीची

       
वाढे गारवा
ऊबदार थंडीत
ऊडे पारवा


दाटले अभ्र
बर्फवृष्टी पसरे
पांढरीशुभ्र


हुडहुडते
गारठले शरीर
कुडकुडते


टोपी, चादर
थंडीशी लढण्याला
असू सादर




Tuesday, November 27, 2018

मनुजा तू... ( गझल )



तुझ्या आपल्या माणसांविना, जगशील कसा मनुजा तू
खोट्या, परक्या लोकांसोबत, हसशील कसा मनुजा तू



जर कमावले नाहीस मित्र, नाही जपली मैत्री तू
खांद्यावरती त्या शत्रूच्या, रडशील कसा मनुजा तू



पणाला लाव कौशल्य तुझे, मनगटातले दाखव बळ
कष्ट न करता सहजासहजी, हरशील कसा मनुजा तू



नवरंगी या जीवनात तू, राहू नकोस कृष्णधवल
गजबजलेल्या जगी एकटा, रमशील कसा मनुजा तू



शिकला नाही जर विद्या तू, पोहायाची संसारी
संसाराच्या भवसागरात, तरशील कसा मनुजा तू




आजकाल ( कविता )





वेड्यासारखा वागतो आजकाल
कुणालाही चावतो आजकाल




ती नसतांना, आठवणीत तिच्या
गजरा जुना माळतो आजकाल


ऐकायला आवडायची जी लकेर तिला
पुन्हा - पुन्हा छेडतो आजकाल


कित्येकदा तुटले तरी, चैन ना
हृदय माझे सांभाळतो आजकाल


तिच्या असण्याचा सुगंध, ती नसतांना
कुपीत बंदिस्त ठेवतो आजकाल


फुटला होता मनाचा प्रेमआरसा
तेच तुकडे जोडतो आजकाल


पसरू दे सुगंध, बहरू दे झाड
प्रेमरोपटे हृदयी लावतो आजकाल

इंद्रधनू ( कविता )



माझ्या दारात सजले
छान इंद्रधनूचे तोरण
चंद्र, सूर्य, तारे, वारे
यांना दिले आमंत्रण


तेजस्वी सूर्य तांबडा-लाल
आला उधळीत प्रकाश
दवबिंदू चमकती तृणावर
सुंदर निळे-निळे आकाश


रात्री आला चंद्र भाऊराया
चंद्रिकांनी सजले नभांगण
वाटते नटले आज येथे
ताऱ्यांनी जणू तारांगण


आले सात रंग उधळत
सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य
रंगीबेरंगी किरणे आली
सुखाचे झाले आयुष्य


अशी इंद्रधनूची कमान
रंग उधळते सात
एकमेकांच्या साथीने
करूया संकटावर मात


तुझं अस्तित्व... ( कविता )






नदीच्या प्रीतीसंगमावर मी जाऊन येईन म्हणते...
तिथे तुझ्या अस्तित्वाच्या सर्व खुणांना स्पर्श करून येईन म्हणते...
नदीच्या सोनेरी वाळूवर तू कधीतरी चालला असशील...
त्याच वाळूवर तुझ्याच पाऊलखुणांवर हळूवार चालून येईन म्हणते...

तिथे असलेल्या बगीच्यात,
गुलाबी, केशरी, लाल, पांढरी, जांभळी
सर्वच रंगाची फुलं असतील
त्या प्रत्येक फुलाला हलकासा स्पर्श करून तुझ्या मऊ गालांचा स्पर्श जाणून घेईन म्हणते...

बगीच्यात असलेल्या प्रत्येक बाकड्यावर थोडा-थोडा वेळ बसून येईन म्हणते...
तिथे सर्व प्रकारची लोकं असतील
लहान मुलं, म्हातारी माणसं, जोडपी, प्रेमीयुगुलं, विक्रेते, एकटी-दुकटी माणसं...
त्या जोडप्यांकडे बघून, तो नवरा म्हणजे तू आणि ती बायको म्हणजे मी...
अशी कल्पना करून थोडा वेळ जगून घेईन म्हणते...


तिथे असलेल्या एखाद्या भिंतीला कधीतरी तुझ्या हाताचा स्पर्श झाला असेलच...
तिथल्या प्रत्येक भिंतीला हात लावून तुझा तो स्पर्श जाणून घेईन म्हणते...


तुझ्या गावात तू आत्ता राहतोस की नाही, ते माहित नाही...
पण, तुझं गाव मात्र माहित आहे...
तुझ्या गावात जाऊन, प्रत्येक चौकात, प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात तुला शोधून काढावं म्हणते...
तू जर अजूनही तिथे राहत असशील तर तू कुठे ना कुठेतरी सापडशीलच ना...
तुझ्या गावी जाऊन तुला शोधून काढावं म्हणते...

तू सापडल्यावर, तुझ्या नजरेला नजर देण्याची हिंमत माझ्यात नाहीये रे...
तुझं घर सापडलं तर,
त्या घरात तुझी बायको असेल...
तुझ्या बायकोचा हात हातात घेऊन तुझा उबदार स्पर्श जाणून घेईन म्हणते...
तुझ्या बायकोचा हाच गुलाबी-मऊ हात तू तुझ्या हातात घेत असशील ना...
तुझ्या बायकोच्या अंतरंगात डोकावून, तिच्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन जिथे-जिथे तू असशील तिथे जाऊन तुझं अस्तित्व जाऊन घेईन म्हणते...

थोड्या वेळाने जर तू 
आलास माझ्यासमोर...
तर,

तुझी-माझी भांडणं विसरून,
तुझं घर विसरून,
तुझं कुटुंब विसरून,
तुझी बायको विसरून,
मला स्वतःला विसरून,
हे सर्व जग विसरून,
तुझ्या-माझ्यातल्या सर्व मर्यादा विसरून

तुझ्या घट्ट ऊबदार मिठीत येईन म्हणते...
तुला कायमचं स्वीकारण्यासाठी...


हो, 
तुझ्या घट्ट ऊबदार मिठीत येईन म्हणते...
तुला कायमचं स्वीकारण्यासाठी...

राजसा राजसा... ( गझल )



रोज न्याहाळतो, राजसा राजसा
अन् मला भाळतो, राजसा राजसा 



भेट होता कधी, भारलेल्या क्षणी
आसवे गाळतो, राजसा राजसा 



देतसे प्रेम तो, घेतसे प्रेम तो
प्रेम ते पाळतो, राजसा राजसा



तो सुगंधी कुपी, मी गुलाबी कळी
रात्र गंधाळतो, राजसा राजसा




ठाव नाही कुणा, प्रेम हे आमचे
राज सांभाळतो, राजसा राजसा 



सुखाची रात ( गझल )





हिंमतीने चालतांना, संकटावर मात होते
कष्ट केले खूप दिवसा, मग सुखाची रात होते

मी लढाई थांबवूनी, घेतसे माघार जेव्हा
देत होते पाठबळ ते, बायकोचे हात होते

जीवघेणी ही सवय मज, दुःख माझे झाकतो मी 
होतसे भूकंप रोजच, या मनाच्या आत होते

वर्ष सरले, दोस्त गेले, एकटा गावी इथे मी 
भेटती रस्त्यात जेव्हा, मास्तरांशी बात होते

टाकल्या खोडून जाती, धर्म सारे नष्ट केले
भारताला फक्त उरली, 'लोकशाही' जात होते

पुण्यकर्माचे मिळे फळ, त्यास थोडेसे उशीरा
पुण्यवंताच्या घरी मग, एक गोंडस नात होते

बंदिशी या ऐकतांना, ही 'उमा' का भान हरली ?
पोर गवयाचे सुरांना, खेळवूनी गात होते

कधीकधी... ( कविता )

एकटाच मी निजतो कधीकधी
माझाच मी उरतो कधीकधी


 
झाली सवय जीवघेण्या दुःखाची
तरीही दुःख प्राशन करतो कधीकधी




ओढ न श्रृंगाराची, न प्रेमाची राहिली
नाद पैंजणांचा जीव चाळवतो
कधीकधी


या वार्धक्यात वाटते लहानगे व्हावे
बुडबुडे साबणाचे धरतो कधीकधी 



काठी जरी हातात, मन तरूण आहे
बागेत हिरव्या भटकतो कधीकधी 




पुसटशा झाल्या प्रेमळ आठवणी तिच्या
धूळ चष्म्यावरची साफ करतो कधीकधी 



अजून पडावा पाऊस, धरा व्हावी हिरवी
लाल साडीत तिलाच बघतो कधीकधी 



एकांत हा वाटतो नकोसा मला आता
नातवंडाच्या मिठीसाठी झुरतो कधीकधी 



वाढत्या वयासोबत विरल्या काही गोष्टी
वारा उगाच मन ढवळतो कधीकधी 



हे देवा, येतो आता तुझ्याजवळ मी
अताशा देवास विनवतो कधीकधी 



आले वाटते बोलावणे मला देवाचे
स्वप्नात यम अचानक दिसतो कधीकधी

 
खाऊन घेतो चणे-फुटाणे, मेवे-मिठाई
मी मलाच निरोगी समजतो कधीकधी 



सुग्रास भोजन बनवावे तिच्यासारखे
स्वयंपाकात मन रमवतो कधीकधी



दिसते मला स्वर्गात आहे मी, देवा
चित्र स्वर्गाचे सजवतो कधीकधी 



जिंकण्यापेक्षा हरणे वाटते सोपे
याच म्हातारपणाला हरवतो कधीकधी 


क्षणात इकडे, क्षणात तिकडे... ( गझल )



▪ क्षणात इकडे, क्षणात तिकडे  ( गझल ) ▪




असे कसे हे घडे कळेना, क्षणात इकडे क्षणात तिकडे
गुपित मनीचे मनी दडेना, क्षणात इकडे क्षणात तिकडे 
 

मनात बांधून ठेवला मी, सुगंध एकांत आठवांचा
अता मला याद साहवेना, क्षणात इकडे क्षणात तिकडे 
 

न एक जागी पडे... न चाले, दिशेत एकाच राहते ना
इथेच पाऊल थांबते... ना, क्षणात इकडे क्षणात तिकडे 
 

सुकामिनी नार मी फुलासम, भ्रमर दिवाना तुझ्याप्रमाणे
तरीच खुलता कळी खुलेना, क्षणात इकडे क्षणात तिकडे 
 

कधी नदीसम प्रवाह माझा, अबोल होते कधीकधी मी
विहीर मी स्तब्ध... वाहते ना, क्षणात इकडे क्षणात तिकडे 
 

अंधश्रद्धा निर्मूलन ( कविता )

 अंधश्रद्धा निर्मूलन



अरे अरे मूर्खांनो, तुम्ही
नरेंद्र दाभोळकर मारला
असा कसा विज्ञानाला
जीव तुमचा घाबरला ?

या विज्ञानयुगात आपण
घोड्याची नाल पूजतो
समारंभ, रिती-रिवाजाच्या
बेगडी जगात मनसोक्त सजतो

बुवाबाजी, तंत्र-मंत्र, गंडे-दोरे
यांमुळे होत नाही रे मूल
मरणाला कारण ठरते
अंधश्रद्धेची एकच भूल


नको नको रे माणसा
नको भिनवू अंधश्रद्धा मनात
जयजयकार विज्ञानाचा कर
नवीन तंत्रज्ञानाची मिळे साथ

नको आम्हांला जादूटोणा
आता फक्त एकच ध्यास
नाही पाळायची अंधश्रद्धा
विज्ञानाचा होऊ दे विकास

परंपरा... ( अभंग रचना )

परंपरा

••••••••

 

पाळू परंपरा
रिवाज नि रीती
सर्वांवर प्रीती
करूयात..... ॥१॥
 

सारे भारतीय
आपली संस्कृती
सांभाळू प्रकृती
कुटुंबाची..... ॥२॥
 

नेहमी साजरे
आपले उत्सव
सुख महोत्सव
आनंदाने..... ॥३॥
 

जाऊयात सर्व
काशी नि प्रयाग
नको तो वियोग
आपल्यांशी..... ॥४॥
 

पाळू परंपरा
करू दानधर्म
हेच खरे मर्म
जीवनाचे..... ॥५॥
 

जगण्याची रीत
सर्वांना सारखी
व्हावे तू पारखी
माणसाने..... ॥६॥
 

खाण्यात आपल्या
नको मांसाहार
करू शाकाहार
सदोदीत..... ॥७॥