Uma Patil
Saturday, September 19, 2020
Friday, July 24, 2020
जागतिकीकरण... मराठी कविता... Globalization... marathi poem...
जागतिकीकरणामुळे आपण
गेलो जगाच्या अधिक जवळ
माणूस माणसापासून पण इथे
दुरावत चाललाय...
हे लक्षातही आले नाही आपल्या
आपण मग्न आहोत
स्वतःच्याच विश्वात
गुरफटलो आहोत
जागतिकीकरणाच्या विळख्यात
आपण निर्माण केलाय
एक कोष आपल्याच भोवती...
ज्यातून आपण बाहेरच येत नाही
झालंय जागितकीकरण या जगात...
त्या जगातही झालं असेलच
जागतिकीकरण
खरंतर, जागतिकीकरण व्हायला हवं
तुझ्या आणि माझ्या बुद्धीत...
आपल्या सर्वांच्या बुद्धीत
तुटून जायला हवीत सगळी बंधने
कुठेतरी काहीतरी जोडलं जायला हवं.
बुद्धीला माणूसकीची जोड
द्यायलाच हवी...
जागतिकीकरण आपल्या सर्वांच्या बुद्धीतही
व्हायला हवं ना...
Friday, June 19, 2020
आजी... मराठी कविता... grandmother... granny... marathi poem... marathi kavita...
आजी
आजी झाली बाप । आजी झाली माय ।
आणि सांगू काय । मी अनाथ ॥१॥
सांगुनीया गोष्ट । ती घेते बाहूत ।
आजी देवदूत । माझ्यासाठी ॥२॥
देते मला आजी । धडा जगण्याचा ।
लढा संकटाचा । शिकविते ॥३॥
राहावे नेहमी । आजीच्या छायेत ।
तिच्याच मायेत । कृतार्थाने ॥४॥
'उमा'च्या आजीला । सुखी ठेव देवा ।
करते मी सेवा । अहोरात्र ॥५॥
Sunday, May 10, 2020
भूत... मराठी कविता... bhoot... ghost... marathi kavita.... marathi poem
एक अक्राळविक्राळ आकृती
दोन्ही पायांनी उलटी
काय होईल माझे ?
जर झाली ती सुलटी
अस्ताव्यस्त पिंजारलेले केस
भयग्रस्त काळे रूप
माझ्यासमोर आले अचानक
घाबरगुंडी उडाली खूप
कुठे पळू ? कोणत्या दिशेने ?
वाटते अनामिक भीती
खोलीत एकटीच आहे मी
हलतांना दिसती भिंती
पांढरी साडी, काळेकुट्ट अंग
हातात धरून मेणबत्ती
सरकता ती जराशी पुढे
झाली माझी गुल बत्ती
माझ्याकडे बघितले तिने
घाणेरड्या लालभडक नेत्रांनी
अंग-अंग हादरली मी
माझ्या सर्वच गात्रांनी
हाताच्या नसा हिरव्या
दात, सुळे किळसवाणे
रक्त माखलेले अंगावर
माझ्या गात होती रडगाणे
भीतीने उडाले माझे होश
तोंडातून शब्द निघेना
विरून गेली ती आकृती
तरी अनामिक भीती जाईना
Thursday, March 12, 2020
कविता म्हणजे... मराठी कविता... Marathi poem... Marathi Kavita...
माझी कविता म्हणजे काय ?
मनातल्या शब्दांचे गुंफण
हृदयी कायमच्या कोरलेल्या
भावनांचे नाजूक कोंदण..... [१]
कधी शांत, संयमित, मृदू
कधी कविता असते निखारा
ज्वलंत, धगधगणारा, अंगार
विद्रोही कवितेमुळे येतो शहारा..... [२]
सुगंधासाठी काही मिसळले शब्द
तरलतेने ओवला शब्दांचा हार
आनंदी असेल मी जर का,
कविता असते सुखाची धार..... [३]
मनातली भावना उतरते कागदावर
तेव्हाच तर कविता बनत जाते
आपल्या आयुष्यातील क्षणांचा
ती मग अलगदतेने मागोवा घेते..... [४]
जीवनात जेव्हा प्रेम असते
तेव्हा नाजूक प्रेमाचे चित्रण
चिंध्या झाल्यावर मनाच्या मात्र
ओरबाडलेल्या हृदयाचे कात्रण..... [५]
भिडावी रसिकापर्यंत कविता
मग कवितेने घालावा दंगा
नित्य झरावी लेखणीतून
ही कवितेची अविरत गंगा..... [६]
Sunday, March 8, 2020
होळी... रंगपंचमी... मराठी कविता... Holi... Rangpanchami... marathi kavita... marathi poem...
स्पर्धेसाठी कविता
विषय - होळी
आज होळीत मित्रांनो
चला जाळूया सारे दोष
राहूया नेहमी प्रेमाने
मनी असू देऊ संतोष
आजच्या दिवशी होळीला
दाखवू नैवैद्य पुरणाचा
सत्मार्गावर चालूया नेहमी
हाच मार्ग ठेवू जगण्याचा
करूया पूजा होळीची
मनातले मिटावेत पाप
शांत व्हावे मन साऱ्यांचे
मनात नको यावा संताप
राहूया, बोलूया प्रेमाने
मिटवू भांडणे सारी
मांगल्याचे, विश्वासाचे
लावूया तोरण दारी
रंग टाकू एकमेकांवर
विसरू सारे द्वेष
प्रेम देऊ, प्रेम घेऊ
संपवून टाकू सारे क्लेष
Wednesday, February 26, 2020
गौरव मराठीचा... मराठी कविता... Marathi poem...
माझ्या मराठी भाषेचा
आहे मला अभिमान
चला गाऊयात सारे
मराठीचे गुणगान... <१>
चौदाखडी पाटीवर
कौतुकाने लिहूयात
गोड आपल्या वाणीने
मराठीत बोलूयात... <२>
परकीय शब्दसुद्धा
उरी सामावून घेते
तिच्यातले प्रेम सारे
पूर्ण जगताला देते... <३>
वृत्ते, कविता, गझल
मराठीचे अलंकार
मात्रा, उकार, वेलांटी
हाच भाषेचा श्रृंगार... <४>
मराठीचा हा गोडवा
सदा अमर रहावा
गोड भाषेचा सन्मान
सर्व लोकांनी करावा... <५>
अशी मधाळ मराठी
शोभे कशी राजभाषा
सदा रहावी, टिकावी
एवढीच एक आशा... <६>
Subscribe to:
Posts (Atom)